कधी कधी शांत राहणं शहाणपणाचं
लक्षण असतं. प्रत्येक वादात उडी घेणं शहाणपण नाही, हेही तितकंच खरं. पण आज प्रश्न असा आहे की, आपण शांत आहोत म्हणून शहाणे आहोत की गप्प आहोत म्हणून सुरक्षित.?

समाजात चुकीचं घडतंय, अन्याय दिसतोय, अपमान ऐकू येतोय तरीही आपण गप्प राहतो. कारण आवाज उठवला तर त्रास होईल, संबंध बिघडतील, ओळखीतले लोक नाराज होतील, कदाचित आपलंच नुकसान होईल. त्यामुळे मौन स्वीकारलं जातं आणि हळूहळू ते सवय बनतं.

आज मौन हा पर्याय राहिलेला नाही; तो स्वसंरक्षणाचं कवच झाला आहे. कार्यालयात अन्याय होत असो, सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन घडत असो, राजकारणात दांभिकपणा दिसत असो; बहुतेक वेळा प्रतिक्रिया येते ती फक्त मनात. बाहेर मात्र शांतता. पण ही शांतता कुणासाठी उपयुक्त आहे..?

इतिहास साक्षी आहे. बदल घडवणारे लोक कधीच सोयीस्कर मौनात राहिले नाहीत. त्यांचं बोलणं नेहमी सुखावह नव्हतं, पण गरजेचं होतं. आज मात्र “आपल्याला काय करायचंय?” या वाक्यात समाज बांधिलकी गुंडाळून ठेवली जाते.
मौन ठेवणं सोपं असतं, कारण त्याला किंमत द्यावी लागत नाही. पण आवाज उठवायला धैर्य लागतं, धोका पत्करावा लागतो. म्हणूनच मौनाला ‘शहाणपण’ म्हणणं आपल्याला सोयीचं वाटतं. खरं शहाणपण म्हणजे प्रत्येक वेळी ओरडणं नव्हे; योग्य वेळी बोलण्याचं धाडस ठेवणं होय. चुकीला पाहूनही गप्प बसणं हे शहाणपण नाही. ते भ्याडपणाचं आधुनिक रूप आहे.

आज समाजाला मोठ्या आवाजांची नाही, तर सचोटीने बोलणाऱ्या सामान्य माणसांची गरज आहे. कारण जेव्हा सज्जन गप्प बसतात, तेव्हा अयोग्य लोक निर्भय होतात.
म्हणूनच मौन ठेवण्याआधी स्वतःला एकच प्रश्न विचारावा “आज मी गप्प बसलो, तर उद्या ही चूक वाढणार आहे का..?”
*जर उत्तर हो असेल,*
*तर ते मौन शहाणपण नाही…*
*ते जबाबदारीपासून पळणं आहे.*
*ॲड. जमील देशपांडे*
अध्यक्ष मराठी प्रतिष्ठान..
