जळगाव ,प्रतिनिधी – जळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत आज उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान एक मोठी आणि धक्कादायक घडामोड समोर आली आहे. एका प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारी अर्जांवर डिजिटल सही (Digital Signature) असल्याबाबत आक्षेप घेत भाजपने थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली असून प्रादेशिक पक्षांच्या सर्व उमेदवारांना अपात्र ठरवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.दरम्यान या प्रकरणी 3 वाजता सुनावणी ठेवण्यात आली असल्याचे समजते.

भाजपने दाखल केलेल्या अर्जात असा दावा करण्यात आला आहे की, निवडणूक नियमांनुसार उमेदवारी अर्जावर उमेदवाराची हस्ताक्षरातील मूळ सही अनिवार्य असून, डिजिटल सही ग्राह्य धरता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज नियमबाह्य ठरत असून ते तत्काळ बाद करावेत, अशी ठाम भूमिका भाजपने मांडली आहे.
या आक्षेपामुळे जळगाव महापालिका निवडणुकीच्या राजकीय वातावरणात एकच खळबळ उडाली आहे. प्रादेशिक पक्षातील उमेदवारांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता पसरली असून, अनेक उमेदवारांनी कायदेशीर सल्ला घेण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाची सखोल छाननी सुरू असून, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आणि कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेतला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. नियमांचा भंग झाल्याचे स्पष्ट झाल्यास संबंधित उमेदवारांवर कारवाई होऊ शकते; मात्र नियमांत डिजिटल सहीला काही प्रमाणात मान्यता असल्यास भाजपचा आक्षेप फेटाळला जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
या प्रकरणामुळे जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत पुढील काही दिवस राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि कायदेशीर लढाई रंगण्याची चिन्हे दिसत असून, निवडणूक निर्णय अधिकारी नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
