महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्याने राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. येत्या महिनाभर विविध राजकीय पक्ष, आघाड्या तसेच अपक्ष उमेदवार जनतेसमोर आपले विचार, विकासाचे आराखडे आणि भविष्यातील दृष्टी मांडणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे लोकशाहीची मुळे अधिक भक्कम करणारी प्रक्रिया आहे.

निवडणूक काळ हा केवळ एका महिन्याचा असतो; मात्र या काळात निर्माण होणारी कटुता, वैर भावना आणि व्यक्तिगत शत्रुत्व अनेकदा दीर्घकाळ समाजात टिकून राहते. राजकीय मतभेदांमुळे सामाजिक सलोखा बिघडणे ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे. निवडणुका येतात आणि जातात, पण समाजातील नाती टिकून राहणे अधिक महत्त्वाचे आहे.

निवडणूक लढत ही खेळीमेळीच्या, सुसंस्कृत आणि सकारात्मक वातावरणात होणे अपेक्षित आहे. आरोप-प्रत्यारोप, चिखलफेक, अफवा, किंतु-किल्मीश तसेच द्वेषभावना भडकवणारे वक्तव्य टाळणे ही सर्व उमेदवारांची नैतिक जबाबदारी आहे. विकास, मूलभूत सुविधा, नागरी समस्या आणि प्रशासनातील पारदर्शकता या मुद्द्यांवर चर्चा होणे आवश्यक आहे.

सर्व राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांनी संयम आणि परिपक्वता दाखवणे काळाची गरज आहे. मतदारांचा विश्वास जिंकण्या
साठी सभ्य प्रचार, स्पष्ट भूमिका आणि समाजहिताचे धोरण महत्त्वाचे ठरते. लोकशाहीत विरोधक म्हणजे शत्रू नसून वेगळे विचार मांडणारे सहप्रवासी असतात, ही जाणीव कायम ठेवली पाहिजे.
निवडणूक निकालानंतर जो उमेदवार विजयी होईल त्याला शुभेच्छा देणे आणि जो पराभूत होईल त्याने आत्मपरीक्षण करून पुन्हा तयारीला लागणे, हीच लोकशाही संस्कृती आहे. विजय-पराभव तात्पुरते असतात; मात्र सामाजिक ऐक्य आणि विश्वास दीर्घकाळ टिकणारे असतात.
स्थानिक स्वराज्य संस्था या केवळ सत्तेची केंद्रे नसून शहराच्या सर्वांगीण विकासाचे माध्यम आहेत. त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुका द्वेषमुक्त, शांततापूर्ण आणि विकासाभिमुख वातावरणात पार पडाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. लोकशाहीचा हा उत्सव समाजाला जोडणारा ठरावा, फूट पाडणारा नव्हे हीच काळाची मागणी आहे.
ॲड जमील देशपांडे.
