शहरातील सांस्कृतिक वातावरणात भर टाकणारा ५ वा आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल येत्या २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ रोजी रंगणार आहे. अजिंठा फिल्म सोसायटी आणि कान्ह ललित कला केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा महोत्सव एम.जे. कॉलेज परिसरातील कान्ह ललित कला केंद्र येथे संपन्न होईल. यावर्षी ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी यांना मानाचा ‘देवगिरी चित्रतपस्वी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे, तर युवा अभिनेता आरोह वेलणकर आणि अभिनेत्री सुरभी हांडे यांना ‘देवगिरी चित्रगौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे.


देश-विदेशातील ८० लघुपटांची मेजवानी
महोत्सवाचे हे पाचवे वर्ष असून, यंदा देशभरातील २० राज्यांसह विदेशातूनही मोठ्या प्रमाणात प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. तज्ज्ञ परीक्षकांनी निवडलेल्या ८० सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म्सचे प्रदर्शन दोन दिवसांत केले जाईल. या सोहळ्यासाठी देशभरातून सुमारे ३०० युवा फिल्म मेकर्स जळगावात दाखल होत आहेत. संपूर्ण परिसराला ‘दादासाहेब फाळके चित्र नगरी’ असे नाव देण्यात आले असून, स्क्रीनिंग सभागृहांना धर्मेंद्र देओल, संध्या शांताराम आणि प्रिया मराठे यांची नावे देण्यात आली आहेत.

महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आणि कार्यक्रम:
उद्घाटन सोहळा (२८ फेब्रुवारी): सायंकाळी ५:०० वाजता राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत भव्य उद्घाटन होईल. शो मॅन राज कपूर यांच्या जन्मशताब्दी निमित्त विशेष सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला जाईल.
मास्टर क्लास व चर्चासत्रे: * अभिजित गोखले यांचा ‘चित्रपट आणि समाज जागरण’ यावर मास्टर क्लास.
मनोज जोशी यांचा ‘रंगभूमी ते चित्रपट सृष्टी: एक प्रवास’ या विषयावर संवाद.

दिग्पाल लांजेकर यांची ‘छत्रपती शिवराय’ विषयावर प्रकट मुलाखत.
योगेश सोमण आणि अतुल गंगवार यांचा चित्रपट निर्मिती प्रक्रियेवर मार्गदर्शन वर्ग.
टुरिंग टॉकीज: २८ फेब्रुवारीला सायंकाळी ७:०० वाजता बास्केट बॉल मैदानावर दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या
चित्रपटाचे भव्य प्रदर्शन होईल.
पुरस्कार आणि समारोप (१ मार्च):
महोत्सवाचा समारोप १ मार्च रोजी सायंकाळी ५:०० वाजता वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्म, कॅम्पस फिल्म आणि माहितीपटांना वैयक्तिक व सामूहिक पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल.
“हा महोत्सव चित्रपट क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आणि रसिकांसाठी पर्वणी आहे. संपूर्ण कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून जळगावकरांनी याचा लाभ घ्यावा,” असे आवाहन अजिंठा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जयंत शेवतेकर आणि आयोजन समितीने केले आहे.