दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट घडवणारा दहशतवादी उमर मुहम्मदचा (Dr Umar Muhammad) पहिला फोटो समोर आला आहे. त्याने काल संध्याकाळी स्फोट घडवून आणला होता, ज्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आणि २४ जण जखमी झाले होते. मंगळवारी झालेल्या स्फोटापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यामध्ये पार्किंगमधून एक पांढऱ्या रंगाची i20 कार बाहेर पडताना दिसत आहे. त्यात असलेला डॉक्टर हा मोहम्मद उमर असल्याचा संशय आहे. या स्फोटाबाबत पोलिसांनी सांगितले की उमर हा फरिदाबाद मॉड्यूलचा भाग असू शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांचे छापे सुरू आहेत, ज्यात जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणातील फरिदाबाद ते लखनौपर्यंत केलेल्या कारवाईत २९०० किलो स्फोटके (संशयित अमोनियम नायट्रेट) जप्त केली होती.
दिल्ली पोलिस आणि इतर तपास संस्थांच्या तपासात असे समजले की, उमर हा पार्क केलेल्या i20 कारमध्ये तीन तास बसून राहिला. तो एका मिनिट देखील कारमधून बाहेर पडला नाही. असे म्हटले जात आहे की तो या कारमधून हल्ला कसा करायचा, कधी करायचा आणि कुठे करायचा याबद्दल सूचनांची वाट पाहत थांबला होता. याचदरम्यान, त्याचा एक फोटो समोर आला आहे. याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र अनेक प्रसारमाध्यमांनी उमरचा फोटो प्रसिद्ध केला आहे.