
आश्चर्य वाटतं इतकं एकमत माध्यमांचं अचानक कसं झालं? खरं तर ही वाक्यं फक्त बातमी नसतात, तर विचार घडवणाऱ्या ओळी असतात. या ओळी वाचून नव्या उमेदवाराच्या मनात पहिला प्रश्न उभा राहतो आमच्यासाठी जागाच उरली का..? मग हळूहळू दुसरा प्रश्नही रुजतो “हे लोकशाहीचं मैदान आहे की ठरलेला नाटकाचा रंगमंच?”

काल महाराष्ट्रातील सर्व नगरपालिकांचे आरक्षण जाहीर झाले, आणि आज सकाळी माध्यमांमध्ये जणू एकाच सूरात बातम्या झळकल्या “मातब्बरांना फटका नाही..!, प्रस्थापित सर्व बाजूंनी सुरक्षित..!
आज ‘मातब्बर’ हा शब्द सत्तेचं प्रतीक बनला आहे. ज्याने जनतेसाठी काम केलं, प्रामाणिकपणे सेवा दिली, त्यालाच खरा मातब्बर म्हटलं पाहिजे. पण आता ‘मातब्बर’ म्हणजे जुना चेहरा, गटाचा नेता, आणि पुढच्या उमेदवारीचा हमीदार असं समजलं जातं. मग जनतेच्या नजरेतून खरा नेता कुठे हरवतो..?
“आयाराम-गयाराम” नी राजकारणाचं रंगमंच भरलेलं असताना जुन्यांनाच ‘प्रस्थापित’ म्हणून पुन्हा पुढं करायचं ठरलेलं दिसतं. माध्यमं बातमी देतात की, भूमिका घेतात हा विचार इथे महत्त्वाचा आहे. जर मथळ्यांतूनच मतमतांतरे ठरवली जात असतील, तर निवडणूक जनतेची राहिलीच कुठे..?
लोकशाहीचं सौंदर्य आहे नवे चेहरे, नवे विचार, नवी उमेद, जुन्यांना अनुभव आहे, पण नव्यांकडे उत्साह आहे आणि दोन्हींचा संगम झाला तरच विकासाचा प्रवास सुरू राहतो. परंतु एकाच गटात, एकाच मंडळात, एकाच मतदारसंघात पुन्हा-पुन्हा तीच नावे फिरताना पाहिल्यावर लोकशाहीचा अर्थच थंडावतो.
ॲड जमील देशपांडे
जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव.
