निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग १३ (ड) मध्ये राजकीय समीकरणे वेगाने बदलली आहेत. महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रफुल्ल गुलाबराव देवकर यांच्या प्रचाराला वेग आला असतानाच, आता या प्रभागातील दोन प्रमुख अपक्ष उमेदवारांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. अपक्ष उमेदवार मगन व्यंकट पाटील आणि अनिल रमेशचंद्र पगारिया यांनी प्रफुल्ल देवकर यांच्या विजयासाठी आपला पाठिंबा जाहीर केल्याने महायुतीची स्थिती अधिक भक्कम झाली आहे.

या दोन्ही उमेदवारांनी प्रफुल्ल देवकर यांच्या समर्थनाचे पत्र आमदार राजूमामा भोळे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी बोलताना प्रफुल्ल देवकर म्हणाले की, “मिळत असलेला हा पाठिंबा म्हणजे मतदारांचा महायुतीवरील विश्वास आहे. आगामी पाच वर्षांत प्रभागातील उर्वरित विकासकामे अधिक जोमाने पूर्ण केली जातील.” या निर्णयामुळे प्रभाग १३ मध्ये प्रफुल्ल देवकर यांचे पारडे जड झाले असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाजप नेते मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार राजूमामा भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग १३ मध्ये गेल्या काही वर्षांत मोठी विकासकामे झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जळगावच्या सर्वांगीण विकासाचा जो संकल्प सोडला आहे, त्याला बळ देण्यासाठी दोन्ही अपक्ष उमेदवारांनी प्रफुल्ल देवकर यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. मगन पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत आपला पाठिंबा जाहीर केला, तर अनिल पगारिया यांनी प्रभाग १३ च्या विकासासाठी देवकरांच्या पाठीशी उभे राहण्याचे निश्चित केले.
