जळगाव – धरणगाव नगरपालिका निवडणुकीच्या निकालात शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना धक्का बसला आहे. पाटलांच्या होमपीचवर महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आला आहे. धरणगाव नगरपालिकेत महाविकास आघाडी प्रणित शहर विकास आघाडीच्या लिलाबाई सुरेश चौधरी २ हजार ४४७मतांनी विजयी झाल्या असून शिंदेसेनेच्या वैशाली भावे यांना पराभव पत्करावा लागला आहे.

स्थानिक तहसील कार्यालयात सकाळपासून धरणगाव नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाची मतमोजणी सुरू होती. धरणगाव नगरपरिषदेत ११ प्रभाग असून नगराध्यक्ष आणि २३ नगरसेवक अशी २४ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. मात्र या निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडी शहर आघाडीने शिंदेसेनेला धक्का दिला आहे.
मविआचे स्टार नेते प्रचारापासून राहिले दूर

या निवडणुकांच्या प्रचारात महायुतीतील पक्षांसाठी एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी सभा गाजविल्या असताना दुसरीकडे ‘मविआ’तील घटकपक्ष असलेल्या उद्धवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अपवाद वगळता राज्यातील प्रमुख नेते उपलब्ध झाले नाहीत. लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढली.
मात्र या निवडणुकांमध्ये ‘मविआ’ला जिल्ह्यात एकाही जागेवर खातेसुद्धा उघडता आले नाही. या निवडणुकांनंतर मविआतील घटकपक्ष असलेल्या उद्धवसेना, शरद पवार गटाचे अनेक नेते सत्ताधारी महायुतीकडे गेले. त्यात अस्तित्वाच्या लढाईत राज्यपातळीवरील एकही नेता मविआ उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेला नव्हता.
