जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असतानाच, काम करणाऱ्या ठेकेदाराने सर्व नियम आणि सुरक्षितता पायदळी तुडवल्याचे उघड झाले आहे. कार्यालय परिसरात दररोज हजारो नागरिक ये-जा करत असताना, ठेकेदाराकडून रस्त्याच्या कडेला विना-क्रमांकाचे पाण्याचे टँकर उभे करणे, बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकणे, आणि बांधकामाच्या पद्धतीत गंभीर त्रुटी ठेवणे असे धक्कादायक प्रकार सुरू आहेत.

या मनमानी कारभारामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, प्रशासकीय यंत्रणा मात्र या गंभीर नियमांच्या उल्लंघनाकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
ठेकेदाराची मनमानी, नागरिकांचे हाल
रस्त्यावर अडथळा: सामान्य प्रशासन कार्यालयाच्या अगदी समोर आणि रस्त्याच्या वळणावर ठेकेदाराने बांधकाम साहित्य (कच) आणि बिनक्रमांकाचे पाण्याचे टँकर लावून ठेवले आहेत. यामुळे कार्यालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे.

सदर बांधकाम हे ‘आर.सी.सी.’ (RCC) प्रकारचे असताना, बांधकामस्थळी सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही सूचना फलक लावलेला नाही. रस्त्यावर अडचणी निर्माण होतील असे काम सुरू आहे.
बांधकामाची नवीन ‘पद्धत’: कार्यालयाच्या गोल सर्कलला भिंत उभारण्याचे काम सुरू आहे.

मात्र, ठेकेदाराने ‘खाम’ (स्तंभ) उभा करण्यासाठी खाली जास्त खोल न करता थेट आरसीसीचे काम सुरू केले आहे. त्यानंतर त्याला प्लेट लावून त्यावर मटेरियल टाकण्यात येत आहे. ठेकेदाराने ‘खाम निर्माण करण्याची ही नवीन पद्धत’ शोधून काढल्याने कामाच्या गुणवत्तेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.

विना क्रमांकाचे टँकर, आरटीओ नियमांचे उल्लंघन
ज्या पाण्याचे टँकर रस्त्यावर उभे करण्यात आले आहेत, त्यापैकी एकाही टँकरला कोणतेही पासिंग किंवा परमिट असलेले नंबर दिसत नाहीत. विशेष म्हणजे, हे टँकर आणि ट्रॅक्टर असल्याचे दिसून येत आहेत. शेतीच्या कामासाठी असलेले वाहन बांधकामासाठी कसे वापरले जाऊ शकते, असा गंभीर प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.
याबाबत आरटीओ विभागाचे अधिकारी सचिन भारुड यांना विचारणा केली असता, “सार्वजनिक ठिकाणी बांधकामासाठी ट्रॅक्टर व पाण्याचे टँकर नियमांमध्ये वापरता येत नाहीत आणि हे अयोग्य आहे,” अशी कबुली त्यांनी दिली. मात्र, सध्या कारवाईसाठी अधिकारी बाहेर गेले असून, त्यांना समज देण्यात येईल, असे गोलमाल उत्तर त्यांनी दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्रतिसाद नाही.
या संपूर्ण कामाची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनवणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
या कामाबाबत त्यांना यापूर्वी दोन वेळा तक्रार करण्यात आली होती.
त्यावेळी त्यांनी आपण मुंबई येथे चौकशीला असल्याचे सांगितले होते. प्रशासकीय स्तरावर तक्रार करूनही अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने, ठेकेदाराला कोणाचे अभय आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
प्रशासन नागरिकांच्या सुरक्षिततेकडे आणि नियमांच्या उल्लंघनाकडे कधी लक्ष देणार, हा प्रश्न उपस्थित होतआहे.
