जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२५ । मुक्ताईनगर तालुक्यामधून धक्कादायक प्रकार समोर आला आला असून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या मदतीच्या अनुदानात गैरव्यवहार झाला.
याप्रकरणी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दोन तलाठी, प्रत्येकी एक कोतवालासह महसूल सहायकाला निलंबित केले आहे. या कारवाई सोबतच चौघांवर मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अनुदान वाटपात लाखो रुपयांचा अपहार झाला असल्याचा आरोप शिंदेसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तसे पुरावेही त्यांनी महसूल प्रशासनाला दिले होते. त्यानंतर जिल्हाधिकारी घुगे यांनी एका समितीकरवी चौकशी केली.
मुक्ताईनगर तालुक्यातील बोरखेडा येथील तलाठी महेंद्र वंजारी, उचंद्याचे कृष्णकुमार ठाकूर (हल्ली पारोळा येथे सेवारत), तहसीलदार कार्यालयातील महसुल सहायक मनिष बेंडाळे व उंचद्याचे कोतवाल राहुल सोनवणे यांचा समावेश आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही अशा पद्धतीने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम करणे अपेक्षीत आहे. अशा प्रकारचे गैरव्यवहार तपासण्यासाठी इतर तालुक्यांमध्ये पथक पाठवल्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले.