मी, दीपककुमार पी. गुप्ता सामाजिक कार्यकर्ता, गेल्या अनेक महिन्यांपासून 108 अॅम्ब्युलन्स सेवेमध्ये डॉक्टरांनी रुग्णाजवळ मागील बाजूस बसून मार्गात प्राथमिक उपचार देणे बंधनकारक असतानाही प्रत्यक्षात हे पालन होत नाही, हा गंभीर मुद्दा सातत्याने मांडत आलो आहे.
याबाबत यापूर्वी जिल्हा शल्यचिकित्सक जळगाव, संबंधित अधिकारी तसेच 108 अॅम्ब्युलन्स व्यवस्थापनाकडे अनेक वेळा तक्रारी नोंदवल्या. त्यानंतर डॉक्टरांना सूचना आणि चेतावणीही देण्यात आली की पुढे असे आढळल्यास कठोर कार्यवाही केली जाईल असे स्वत: प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले होते.
परंतु आज दिनांक 22/11/2025 रोजी दुपारी 12.46 वाजता जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पुन्हा त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली.
RTO रजिस्ट्रेशन क्रमांक MH-14 CL 0792 असलेली 108 अॅम्ब्युलन्स घटनास्थळी आली आणि डॉक्टर पुन्हा पुढच्या सीटवर बसलेले होते.
रुग्ण मागे असतानाही डॉक्टरांनी रुग्णाजवळ बसून प्राथमिक उपचार देणे टाळले. या घटनेचा GPS व्हिडिओ पुरावा माझ्याकडे उपलब्ध आहे.
आणि आता एक प्रश्न थेट आरोग्य व्यवस्थेला विचारला पाहिजे:
गरिब आणि असहाय्य रुग्णांचा जीव एवढा स्वस्त आहे का?
रुग्णाचा जीव वाचवणे ही पहिली जबाबदारी आहे.
अंमलबजावणीशिवाय नियम, आदेश, GR फक्त कागदावर राहिले तर त्याचा काय उपयोग…?
तसेच,ज्यांच्याकडे पैसा आहे ते मोठ्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जातात.
ज्यांच्याकडे पैसा नाही ते आवश्यक सुविधांचा अभाव असलेल्या सिव्हिल आणि सरकारी हॉस्पिटलवरच अवलंबून राहतात.
हीच जनता जेव्हा 108 अॅम्ब्युलन्स बोलावते, तेव्हा त्यांना मिळणारी वैद्यकीय सेवा किमान नियमांप्रमाणे तरी योग्य असावी असे अपेक्षित आहे.
ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कोणती यंत्रणा प्रत्यक्ष काम करत आहे?
याआधीही सातत्याने तक्रारी करून मुद्दा उचलून धरला आहे.
परिणाम काय? काही दिवस चर्चा आणि नंतर पुन्हा तीच परिस्थिती.
असे किती दिवस सुरू राहणार?
सामान्य लोकांच्या जिवाची किंमत कोणी आणि कधी समजून घेणार?
हा लढा माझा वैयक्तिक नाही, हा गरीब रुग्णांच्या हक्कांसाठी आहे.
व्यवस्थेने काम सुरू करेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील.दीपककुमार पी. गुप्ता यांची मागणी!